Tuesday, June 24, 2008

अमेरीकेत साहित्य संमेलन करणार हे जाहीर झाल्यापासून नेहमीप्रमाणे वादाला सुरुवात झाली.त्यावर थोडे काही

साधारणपणे एक वर्षापूर्वी सकाळ मध्ये नेहमीच्या "वाचकांच्या" पत्रव्यवहारामध्ये अनेक सूज्ञ नागरीकांनी आपली परखड मते मांडली होती. विषय होता, अमेरिकेतील लोकांनी दिलेल्या देणगीबद्दल मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया.

बहुतांश लोकांनी सरळ टीकास्त्र सोडले होते जे मला काही तितकेसे पटले नाही. त्यांचा मुद्दा असा होता की भारतातून बाहेर जाऊन उगाच "शो" म्हणून केलेला हा उद्योग ,त्याचे एवढे काय कौतुक. त्यापेक्षा शेतकरी आत्महत्या करत आहेत त्यांच्याकडे लक्ष द्या. अजून एक मुद्दा म्हणजे "या परदेशी स्थायिक मंडळींनी साजरा केलेला होलिकोत्सव कळला.त्यांनी कधी "बैलपोळा" साजरा केल्याचे आठवत नाही." ह्या २ मुद्द्यांमागचा उद्देश मला अजूनपर्य़ंत समजला नाही. शेतकरी,बैलपोळा आणि परदेशी स्थायिक मंडळी यांचा संबंध अगदीच बादरायण आहे. हे तसेच काहीसे असल्यासारखे आहे.

आपल्या मनातला पूर्वग्रह या ना त्या मार्गाने बाहेर काढण्याचा हा एक प्रकार. जर तुमचा आक्षेप परदेशात संमेलन भरवण्यालाच असेल तर माझ्या मते त्याला आखिल "भारतीय" म्हणण्याचीही काही गरज नाही. जर महाराष्ट्राबाहेर जेवढे मंडळी मराठी साहित्यात रस घेतात तेवढेच जर भारताबाहेर अमेरीकेत घेत असतील तर त्यात वावगे ते काय?

आरडाओरड करीत राहणे हे जणू आजकालचा मूलमंत्रच झाला आहे. सर्व गोष्टींमध्ये आपले नाक हे खुपसलेच पाहीजे का? breaking news च्या मागी लागून ज्यात त्यात काहीतरी खुसपट कशाला काढले पाहीजे. चिपळूण मध्ये रेल्वे स्थानकात लोक अडकून पडले की लगेच वाहीन्या आपापले कॅमेरे घेऊन पोचले तिकडे लोकांची मते विचारायला. लोक आरडाओरडा करत होते. जणू काही सरकार आणि रेल्वे व्यवस्थापनानेच मुद्दामून एवढा पाऊस पाडला आहे अशा थाटात तो बातमीदार बडबड करत होता. कोणा official ला फोन लावून लगेच studio मधून प्रश्न
बातमीदार: मदत पोचायला एवढा उशीर का होत आहे?
official: हे बघा. आमची वाहने खाण्यापिण्याच्या सामानासहीत रवाना झाली आहेत. सगळीकडेच पावसाने traffic jam झाला आहे. त्यामुळे कधी पोचेल हे आत्ताच असे काही सांगता येणार नाही
बातमीदार: आमची टीम कधीच तिथे पोचली आहे. मग तुमची गाडी का नाही पोचत?

मी सर्द. "अरे दीडशहाण्या, तू काय बोलतो आहेस.तुमची गाडी तिथे पोचली ना. मग तुम्हाला मदत का नाही नेता आली. कुठल्या तोंडाने प्रश्न विचारतो आहेस तू?"

सर्व काही आपल्या हाती असावे,किंवा आपल्या जवळपास असावे हा अट्टाहास कशाला? झाले एखादे वर्ष संमेलन तर बिघडले कुठे? ह्याच टीकेला समांतर अशी अजून एक गोष्ट म्हणजे क्रिकेटपटूंना मिळणारे मानधन. लोकांना बघवत नाही. एक मॅच खेळून एवढे पैसे मिळवलेले बऱ्याच लोकांना पचवता येत नाही. दुसऱ्याच्या गोष्टी बघायच्याच कशाला? तुम्ही वयाच्या ५ वर्षापासून बाकीच्या गोष्टी सोडून तासंतास सराव केलाय का? तुम्ही सलग ३ महीने आपल्या कुटुंबापासून लांब राह्ताय..आपल्या मुलाशीदेखील बोलायला तुम्हाला वेळ नाही असे झाले आहे का? नाही ना? मग ह्या सर्वांचे फळ म्हणून त्यांना पैसे मिळाले तर काय वाईट आहे.

केवळ लोक परदेशात राहतात हे एक कारण टीकास्त्र सोडण्याला पुरे आहे? जरी ते परदेशात असतील तरी आहेत भारतीय,मराठीच ना. त्यांना जर एखादे साहित्य संमेलन अनुभवायचे असेल तर त्यामागे काय चूक आहे?

एकंदरीत काय, आपला तो बाब्या,दुसऱ्याचे ते कार्टं !!

दुसरे म्हणजे संमेलन कुठे का असेना, वादविवादाच्या भोवऱ्यात ते अडकले नाही तर ते संमेलनच नाही.