Friday, January 19, 2007

"चवीनं खाणार त्याला केप्र देणार" अशी एक जाहिरात होती. पण आमच्यासारखे काही लोक केप्र न खाता चवीने खूप गोष्टी खातात. खाण्याच्या बाबतीत चोखंदळ अनेक लोक असतात पण सर्वांच्या आवडीनिवडी असतातच. त्यामुळे खाणे या विषयावर अनेकदा आपण बरेच सल्ले ऐकत राहतो आणि देतही राहतो. फिट्टंफाट !!!!

घरातून बाहेर पडले की अनेक गोष्टींची आठवण येत राहते. गेली काही वर्षे कानपूरला राहिल्यावर तर जीभेचे लाड पुरवणाऱ्या अनेक गोष्टी आठवत राहतात. पाव भाजी, वेगवेगळ्या उसळी , पुरणपोळी या त्यातल्याच काही गोष्टी. अशा पदार्थांची नावे जरी आठवली की इथे मिळणारे सर्व पदार्थ 'कःपदार्थ' वाटू लागतात.(चहा धरला तर तेही अगदीच काही चूक नाही)
असाच एक नेहमी आठवण येणारा पदार्थ म्हणजे 'हुरडा'.गेली बरेच वर्ष मी हुरडा खाऊ शकलो नाही याची मला हुरहूर लागली आहे.

हुरडा म्हणजे भाजलेल्या ज्वारीच्या कोवळ्या कणसातले दाणे. आता ह्यात ज्वारी,कोवळे कणीस अश्या गरजा असल्याने हुरडा हा सहसा फक्त जानेवारी आणि फ़ेब्रुवारी मध्ये खायला मिळतो. वेगवेगळ्या ज्वारीच्या जातींवर हुरडयाची चव अवलंबून असते. कुचकुची,गूळ्भेंडी या जातींचा हुरडा एकदम गोड असतो. महा्राष्ट्रात सर्व ठिकाणी ज्वारी होत नसल्याने बऱ्याच लोकांना हुरडा फक्त ऐकूनच माहीत असतो.सोलापूरकरांना नवल वाटण्याचे काही कारण नाही पण बाकी मराठी मंडळींसाठी ही आठवण माहितीपूर्ण ठरेल अशी अपेक्षा आहे.

हुरडयाचा संबंध फक्त जीभेशी नसून त्याच्याशी निगडीत बऱ्याच गोष्टी आहेत. सुरुवात करायची झाली तर 'हुरडा पार्टी' साठी पाहिजे एक छानशी 'रविवार सकाळ'. इतर वेळेला आपण रविवारी लवकर उठत नसल्याने हुरडा खायला जाताना ऊन अगदी आल्हाददायक वाटते. अशा ऊन्हाची मजा घेत मस्त शेतावर पोचेपर्यंत आपण नक्कीच "warm up" झालेलो असतो. एकदा का शेतावर पोचलो की मग रानमेव्याचा मस्त आस्वाद घ्यावा. झाडावर चढणे, चिंचा-बोरं पाडणे, शेतात हिंडणे असे काहीतरी केले म्हणजे मग सपाटून भूक लागते. मग पाडलेल्या चिंचा आणि बोरांबरोबर ढाळा खायचा आणि बाकीच्या लोकांसोबत भांडण करायचे.

एवढे सगळे करेपर्यंत एकीकडे हुरडयाची तयारी करुन झालेली असते. म्हणजे ज्वारीची कणसे गोळा केलेली असतात,सोबत वांगी तयार ठेवलेली असतात आणि एका ठिकाणी एक गोल खड्डा करुन त्यात गोवऱ्या भरुन ठेवलेल्या असतात. या पेटवलेल्या "आगटी"कडे बघताच आपल्या ताटात पुढे काय वाढले जाणार आहे याची कल्पना येते आणि मग दुय्यम खाद्यपदार्थ आपोआप बाजूला ठेवले जातात. आगटी पुरेशी पेटली याची खात्री झाली की मग त्या खड्ड्याच्या बाजूने ज्वारीची कोवळी कणसे (ज्यात नुकतेच दाणे भरले आहेत अशी) आणि वांगी एका काठीच्या मदतीने खुपसली जातात. मग 'हुरडा पार्टी' ची महफिल बसते. हुरड्याबरोबर खायला म्हणून सोलापूर स्पेशल दाणे आणि दाण्याची चटणी गूळासोबत ठेवलेली असते. आता फक्त गूळ-दाणे खाणारा माणूस हा गाढव असतो त्यामुळे "गाढवाला गूळाची चव काय" असे म्हणणे सयुक्तिक ठरत नाही. तर मग थोड्या वेळात कणसे मस्त भाजली गेली की मग ती एक एक करुन बाहेर काढली जातात. आणि मग ती कणसे हातांनी मळली की कणसातील दाणे निघू लागतात. हाच आपला 'हुरडा'. एकदा का कणसे मळणे सुरु झाले की मग आपण शांतपणे खायला सुरुवात करयची. मूठमूठभर हुरडा घेऊन आपापल्या आवडीप्रमाणे 'हादडावा'. म्हणजे नुसता खा नाहीतर चटणीबरोबर खा आणि चटणी तिखट लागली तर गूळासोबत खा पण हुरडा तो हुरडाच. यासोबत आगटीत भाजलेली वांगी अख्खी खाण्यातली मजाही आगळीच..अशा सगळ्या पदार्थांचा आस्वाद घेऊन तृप्त झालो की मग मस्त एक ग्लासभरुन ताक प्यायचे आणि ते सुद्धा ज्वारीच्या कणसाच्या दांड्याने ढवळून...अहाहाहाहा

आपल्या पोटाचे एवढे लाड करुन झाल्यावर मग झोपण्यावाचून पर्याय नाही. शांतपणे घरी येऊन अख्खी दुपार झोप काढली की मग वाट बघायची पुढच्या रविवाराची.....

6 comments:

Alpana said...

Hey Salil..

It was excellent...
Keep posting such texts.

alpana

Shashank Kanade said...

are me hurda party kadhich keleli nahi
paN ata wachun jaam utsukata lagliye, ani jewan zalela asunahi bhook lagliye!
chhan lihilays.

Niraj said...

सही यार! हुरडा पार्टीचे दिवस आठवले. त्या रम्य आठ्वणींना उजाळा मिळाला. आपण आता अमेरिकेला जाणार... मग ही मज्जा मिळ्णार नाही रे..या जानेवारी महिन्यात अशा कित्येक गोष्टिं्ची खूप आठ्वाण येते आहे. शिवाय एखाद्या "हुरडा" माहित नसलेल्या माणसासाठी अगदी तोंडात पाणी आणणारा आहे तुझा लेख! आणि last but not least तुझे मराठी लिखाण बरंच सुधारलयं यार! :)

Vidya Bhutkar said...

हल्लीच आई म्हणाली की हुरडा खायला जाणार म्हणून येत्या रविवारी.वाईट वाटत होतं की मला जाता येणार नाही. आता मला हे वाचून अजून वाईट वाटत आहे. :-(

Tulip said...

mi ajun hurda khalla nahi kadhi:(. ani he vachun tar itaki haLhaL vatatey.

good post! marathi blog wishwat swagat:D. keep posting!

Unknown said...

ek number lihila ahe....tondala pani sutala