Thursday, February 28, 2008

१. लुत्फ पे मै तुमसे क्या कहु जाहिद
हाय कमबख्त, तुने पी ही नही


२. पीनेवालो की हरकते देखने का लुत्फ़ मै तुम्हे क्या बताऊ जाहिद
मै ही वो अकेला था जिसने पी ही नही ।

Thursday, February 22, 2007

जर भारतात ब्रिटीश आलेच नसते तर काय झाले असते?
जर तेंडुलकरला खोटा आऊट नसता दिला तर काय झाले असते?
जर मुंबईला एवढा पाऊस पडला नसता तर काय झाले असते?
जर महाराष्ट्रात युतीचे सरकार असते तर काय फरक पडला असता?

असे एक ना अनेक जर..तर चे प्रश्न आपल्याला नेहमी भेडसावत असतात. या "जर..तर" चाच प्रश्न परवा झोपायच्या वेळी मला भेडसावत होता आणि त्यातूनच एक विचारशृंखला तयार झाली..नव्हे विचारांचा गुंता झाला. तोच इथे लिहीत आहे.

जर आणि तर चा आपण जेव्हा विचार करतॊ तेव्हा किती वेळा आपल्याला नंतरच्या शक्यतांचा पूर्णपणे अंदाज असतो?"जर..तर" मधल्या तरचा विचार करताना आपण जो निष्कर्ष काढतो तो कशावर आधारीत असतो? आयुष्यातला प्रत्येक निर्णय "जर..तर" वर अवलंबून असतॊ का? कुठल्या वेळेला आपण "जर..तर" चा विचार न करता सरळ आपले intuition वापरुन निर्णय घेतो? असे एकामागून एक प्रश्न मला पडत गेले.

याचाच विचार करत असताना एक गोष्ट अशी जाणवली की जेव्हा आपण तर च्या शक्यतेबद्दल तर्क करतो तेव्हा अंतिम निष्कर्ष बरयाचदा आपल्या मनाचे समाधान करण्याकरता काढतो. उदा. सचिनला तेव्हा आऊट दिले नसते तर कदाचित आपण जिंकलो असतो...हयाच प्रश्नाला पाकिस्तानचे लोक "आऊट तेव्हा झाला नसता तर नंतर झाला असता,शेवटी भारत जिंकणे काही शक्य नव्हते" असे उत्तर देतील. याचाच अर्थ असा की "जर..तर" मधल्या तर च्या तर्काला unbiased logic नाही. मग त्या तर्काला कितपत अर्थ आहे?काहीतरी करुन त्या तर्काची सत्यता पडताळून पाहता येईल का?

आपल्यापुढे असलेल्या सर्व शक्यता पडताळून,त्या सर्व शक्यतांचा व्यवस्थितपणे विचार करुन आपण जेव्हा एखादा मार्ग अवलंबतो तेव्हा एका अर्थाने आपल्याला तर च्या सर्व तर्कांचा अंदाज असतो आणि त्यांची सत्यताही वास्तव असते. पण अशा वेळेला मग "जर..तर" चा प्रश्नच निरर्थक ठरतो.

सर्वच ठिकाणी आपण "जर..तर" चा विचार नाही करु शकत...जिथे जिथे आपल्याला निर्णय कमी वेळात घ्यायचा असतो तिथे आपण आपल्याला त्या क्षणी जी गोष्ट योग्य वाटेल ती आपण करतो.अशी अनेक उदाहरणे आपल्याला घेता येतील.

जेव्हा आपण एखादा तर्क करतो तेव्हा तो बरयाचदा "जो होता है वो भले के लिये ही होता है" असे मानून मनाची समजूत घालून घेतो. म्हणजेच जे घडतय ते घडणारच होते आणि म्हणूनच घडतय. "तुझे आहे तुजपाशी"ची आठवण मनात ताजी असल्याने "उंटाने उंटासारखेच गेले पाहिजे,घोड्याने घोड्यासारखेच गेले पाहिजे" असा विचार मनात डोकवून गेला. पण त्याचबरोबर माझ्या विचारशृंखलेला नवीन फाटा फुटला. समजा आपण बुद्धीबळाचे नियम थोडे बदलले , म्हणजे जर उंटाची चाल घोड्याला दिली,घोड्याची चाल हत्तीला दिली आणि हत्तीची चाल उंटाला दिली तर final outcome मध्ये काहीच फरक पडणार नाही. म्हणजेच आपण काही जर आणि तर च्या जोड्या बनवल्या आणि तर नंतरचे options बदलले तरी end result तोच राहील. मग ह्या सर्व जगातल्या ह्या "जर..तर" च्या प्रचंड जाळ्यातल्या ह्या अशा जोड्या हुडकायच्या कशा? आणि समजा आपल्याला त्या हुडकता आल्याच तर त्याचा आपण फायदा कसा करुन घ्यायचा?


असे एकामागून एक, असंबद्ध विचारांची मालिका चालू असताना अजून एका विचाराने ती खंडीत केली,
की समजा हे "जर..तर" नसते तर काय झाले असते???

आणि ह्या अशा अनेक असंबद्ध आणि अनुत्तरीत प्रश्नांना साथीला घेऊन मी झोपी गेलो

Friday, January 19, 2007

"चवीनं खाणार त्याला केप्र देणार" अशी एक जाहिरात होती. पण आमच्यासारखे काही लोक केप्र न खाता चवीने खूप गोष्टी खातात. खाण्याच्या बाबतीत चोखंदळ अनेक लोक असतात पण सर्वांच्या आवडीनिवडी असतातच. त्यामुळे खाणे या विषयावर अनेकदा आपण बरेच सल्ले ऐकत राहतो आणि देतही राहतो. फिट्टंफाट !!!!

घरातून बाहेर पडले की अनेक गोष्टींची आठवण येत राहते. गेली काही वर्षे कानपूरला राहिल्यावर तर जीभेचे लाड पुरवणाऱ्या अनेक गोष्टी आठवत राहतात. पाव भाजी, वेगवेगळ्या उसळी , पुरणपोळी या त्यातल्याच काही गोष्टी. अशा पदार्थांची नावे जरी आठवली की इथे मिळणारे सर्व पदार्थ 'कःपदार्थ' वाटू लागतात.(चहा धरला तर तेही अगदीच काही चूक नाही)
असाच एक नेहमी आठवण येणारा पदार्थ म्हणजे 'हुरडा'.गेली बरेच वर्ष मी हुरडा खाऊ शकलो नाही याची मला हुरहूर लागली आहे.

हुरडा म्हणजे भाजलेल्या ज्वारीच्या कोवळ्या कणसातले दाणे. आता ह्यात ज्वारी,कोवळे कणीस अश्या गरजा असल्याने हुरडा हा सहसा फक्त जानेवारी आणि फ़ेब्रुवारी मध्ये खायला मिळतो. वेगवेगळ्या ज्वारीच्या जातींवर हुरडयाची चव अवलंबून असते. कुचकुची,गूळ्भेंडी या जातींचा हुरडा एकदम गोड असतो. महा्राष्ट्रात सर्व ठिकाणी ज्वारी होत नसल्याने बऱ्याच लोकांना हुरडा फक्त ऐकूनच माहीत असतो.सोलापूरकरांना नवल वाटण्याचे काही कारण नाही पण बाकी मराठी मंडळींसाठी ही आठवण माहितीपूर्ण ठरेल अशी अपेक्षा आहे.

हुरडयाचा संबंध फक्त जीभेशी नसून त्याच्याशी निगडीत बऱ्याच गोष्टी आहेत. सुरुवात करायची झाली तर 'हुरडा पार्टी' साठी पाहिजे एक छानशी 'रविवार सकाळ'. इतर वेळेला आपण रविवारी लवकर उठत नसल्याने हुरडा खायला जाताना ऊन अगदी आल्हाददायक वाटते. अशा ऊन्हाची मजा घेत मस्त शेतावर पोचेपर्यंत आपण नक्कीच "warm up" झालेलो असतो. एकदा का शेतावर पोचलो की मग रानमेव्याचा मस्त आस्वाद घ्यावा. झाडावर चढणे, चिंचा-बोरं पाडणे, शेतात हिंडणे असे काहीतरी केले म्हणजे मग सपाटून भूक लागते. मग पाडलेल्या चिंचा आणि बोरांबरोबर ढाळा खायचा आणि बाकीच्या लोकांसोबत भांडण करायचे.

एवढे सगळे करेपर्यंत एकीकडे हुरडयाची तयारी करुन झालेली असते. म्हणजे ज्वारीची कणसे गोळा केलेली असतात,सोबत वांगी तयार ठेवलेली असतात आणि एका ठिकाणी एक गोल खड्डा करुन त्यात गोवऱ्या भरुन ठेवलेल्या असतात. या पेटवलेल्या "आगटी"कडे बघताच आपल्या ताटात पुढे काय वाढले जाणार आहे याची कल्पना येते आणि मग दुय्यम खाद्यपदार्थ आपोआप बाजूला ठेवले जातात. आगटी पुरेशी पेटली याची खात्री झाली की मग त्या खड्ड्याच्या बाजूने ज्वारीची कोवळी कणसे (ज्यात नुकतेच दाणे भरले आहेत अशी) आणि वांगी एका काठीच्या मदतीने खुपसली जातात. मग 'हुरडा पार्टी' ची महफिल बसते. हुरड्याबरोबर खायला म्हणून सोलापूर स्पेशल दाणे आणि दाण्याची चटणी गूळासोबत ठेवलेली असते. आता फक्त गूळ-दाणे खाणारा माणूस हा गाढव असतो त्यामुळे "गाढवाला गूळाची चव काय" असे म्हणणे सयुक्तिक ठरत नाही. तर मग थोड्या वेळात कणसे मस्त भाजली गेली की मग ती एक एक करुन बाहेर काढली जातात. आणि मग ती कणसे हातांनी मळली की कणसातील दाणे निघू लागतात. हाच आपला 'हुरडा'. एकदा का कणसे मळणे सुरु झाले की मग आपण शांतपणे खायला सुरुवात करयची. मूठमूठभर हुरडा घेऊन आपापल्या आवडीप्रमाणे 'हादडावा'. म्हणजे नुसता खा नाहीतर चटणीबरोबर खा आणि चटणी तिखट लागली तर गूळासोबत खा पण हुरडा तो हुरडाच. यासोबत आगटीत भाजलेली वांगी अख्खी खाण्यातली मजाही आगळीच..अशा सगळ्या पदार्थांचा आस्वाद घेऊन तृप्त झालो की मग मस्त एक ग्लासभरुन ताक प्यायचे आणि ते सुद्धा ज्वारीच्या कणसाच्या दांड्याने ढवळून...अहाहाहाहा

आपल्या पोटाचे एवढे लाड करुन झाल्यावर मग झोपण्यावाचून पर्याय नाही. शांतपणे घरी येऊन अख्खी दुपार झोप काढली की मग वाट बघायची पुढच्या रविवाराची.....